भगवतीदेवीचा आराधखाना उद्या, रंगणार आराध्यांच्या स्पर्धा …. 

साद मराठी न्यूज नेटवर्क :

सोलापूर जिल्ह्यासह मराठवाडा,विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या तडवळे (या )येथील भगवतीदेवीचा मानाचा आराधखाना शुक्रवारी साजरा होत आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर या आराधखान्यावेळी बावीस गावातील आराध्यांच्या स्पर्धा, दरवर्षीप्रमाणे करण्यात येणारी विद्युत रोषणाई आणि छबिना व पादुकांची मिरवणूक खास आकर्षण ठरत आहे……. श्री भगवती देवीच्या वर्षातून दोन यात्रा केल्या जातात. एक नवरात्र ते विजयादशमी आणि दुसरी चैत्र वैशाखात येणारा आराधखाना, या दिवशी देवीचे पूजारी आनंद गुरव भगवती देवीची विविध अंलकारांनी पूजा सजवून आकर्षक बनवतात.देवीची मुर्ती स्वयंभू असल्याने भाविक मनापासून गाऱ्हाणं मांडतात.स्वभावाने कडक,भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी ख्याती असल्याने जागृत देवस्थान म्हणून उदयास आले आहे. त्यामुळे भाविक व श्रद्धाळू एकच गर्दी करतात.सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी तडवळे गावाच्या पश्चिमेला असलेल्या दक्षिण वाहीनी भोगावती नदीमध्ये श्री भगवती देवीची मुर्ती आढळून आली. रोज प्रांतकाल स्नान करण्यास जाणाऱ्या महंत बल्लाळ यांच्या हातात देवीची मुर्ती आली.गावकऱ्यांनी “आई राजा उदं उदं” करीत वाजतगाजत मुर्ती गावात आणून विधीवत पूजा केली. मुर्ती भोवती आकर्षक मंदीर उभारले.तेव्हापासून आजतागायत गावात नवरात्रीचे नऊ दिवस मोठया भक्तिमय वातावरणात यात्राउत्सव सुरू आहे.देवीची मुर्ती दोन फूट उंचीची शिवकालीन असून स्वयंभू आहे.शालीग्राम सारखी मऊ गुळगुळीत चल स्वरूपातील असून अष्टभूजाधारी आहे. देवी सिंहावर आरूढ होऊन दैत्याचा संहार करीत असल्याच्या रूपात आहे. उजवीकडील हातात बाणांचाभाता, सुदर्शन चक्र, खड़ग , त्रिशूल,आहे. तर डावीकडील हातामध्ये शंख ढाल,धनुष्य आणि दैत्याची शेंडी धरली आहे. देवीच्या पायाशी तिघे दैत्य शरण आलेले आहेत.देवीच्या डोक्याला ,हातात,कानात, कमरेस, पायात विविध अलंकार आहेत.

श्री भगवती देवी

शुक्रवारी रात्री देवीचा छबीना निघतो. विधीवत पूजा करून गावातील मुख्य मार्गावरून छबिना मिरवणूक निघते. पालखी पुढे पारंपारिक वाद्य, टाळमृदंग आणि आराधी मंडळी गाणी म्हणतात. सध्या यात्रेचे खास आकर्षण विद्युत रोषणाई ठरत असून पालखी मार्गासह संपूर्ण मंदिराला नयनरम्य विद्युत रोषणाई केली जात आहे. ही आकर्षण विद्युत रोषणाई आणि शोभेचे दारूकाम पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करीत आहेत. या वेळी मंदीरात बावीस गावातील आराधी मंडळांची स्पर्धा रंगते यातून विजेता व उपविजेता ठरवून त्यांचा गौरव केला जातो. या निमित्ताने शनिवारी गावातील यशवंतराव चव्हाण प्रशालेच्या प्रांगणात करमणूकीचा कार्यक्रमही ग्रामस्थांच्या वतीने ठेवण्यात आला आहे. अंकुश जाधव, तात्या भोसले, गणेश जाधव, ज्योतीराम आवारे, सुधाकर नवले, आनंद गुरव, श्रीराम पाटील, खंडू पिस्के,
श्री भगवती देवी सेवा मंडळ, आराधी मंडळ,श्री भगवती देवी ट्रस्ट आणि तडवळे ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभत आहे.

जाहिरात
Back to top button