राजकीय

गटातटात लढणाऱ्या वैराग नगरपंचायतची लढत यंदा पक्षीय पातळीवर,सेनेची मात्र आघाडी ?

वैराग दि ( किरण आवारे ) : एरव्ही गटातटाच्या राजकारणामुळे वैरागच्या निवडणुका जिल्ह्यात गाजत होत्या, मात्र यंदा नव्या नगरपंचायतीची निवडणूक पक्षीय पातळीवर होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील निवडणूक राज्यात गाजणार एवढे मात्र नक्की झाले आहे. शिवसेना मात्र सहकारी पक्षांना एकत्र येऊन आघाडी करणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.. बार्शी तालुक्यातील आज पर्यंतच्या निवडणुका पक्षापेक्षा व्यक्तीसापेक्ष झाल्याच्या आपण पाहिल्या आहेत. वैराग हा तालुक्याचाच भाग असल्याने इथेही तिच परिस्थिती होती. आता नव्याने अस्तित्वात आलेल्या वैराग नगर पंचायतीची निवडणूक लागली आहे. यापूर्वी निंबाळकर आणि भुमकर या दोन गटांमध्येच वैरागच्या निवडणुका रंगल्या आहेत. मात्र पहिल्या नगरपंचायतीची पहिली निवडणूक पक्षीय पातळीवर होणार असल्याची चिन्हे सध्या होत असलेल्या हालचालीवरून दिसून येत आहेत.बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत हे भाजप गोठ्यातील असल्याचे सर्वश्रुत आहे, त्यांनी वैराग नगरपंचायत लढवण्याचे संकेत दिले असून भाजपाचे कमळ फुलवण्यासाठी तयारीत राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. यावरून वैराग नगर पंचायतीची निवडणूक संतोष निंबाळकर गट कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्चित झाले आहे तर निंबाळकर गटाला पारंपारिक विरोधक असलेले निरंजन भूमकर यांनी राष्ट्रवादी पक्षातून विधानसभा लढवल्या मुळे नगर पंचायतीची निवडणूक ही राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हा द्वारे लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे निरंजन भूमकर यांचा गट राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाच्या माध्यमातून रिंगणात उतरणार आहे.वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री दिलीप सोपल यांची धुरा सांभाळत असलेले अरुण सावंत हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढतात की आघाडी तयार करून लढतात हे अद्याप निश्चित झालेले नाही .भाजपाचे गृहनिर्माण सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे देखील सोबत राहणार असल्याने आघाडी द्वारेच लढण्याची शक्यता अधिक आहे.सध्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून ज्यांची मते अधिक आहेत अशांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र आहे. जो तो नेता सक्षम उमेदवाराच्या शोधात असून कस पणाला लावत आहेत मतदारांचा कौल आपल्या पदरात पडावा यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.स्वर्गीय शिक्षण महर्षी बाळासाहेब कोरके यांनी वैराग शहरामध्ये शैक्षणिक संकुल उभारले आहे. त्यांच्या संकुलात वैराग शहरातील बहुतांश कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोरके गटाचा निर्णय निर्णायक ठरू शकतो. मात्र बाळासाहेब कोरके यांच्या अकाली जाण्याने या गटाची सर्व धुरा संभाळणारे डॉ कपिल कोरके  ह्या वर्षी कोणताही हालचाली करण्याच्या मनस्थितीत असलेले दिसुन येत नाहीत.

राष्ट्रवादी नेते निरंजन भूमकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button