विशेष

राज्यातील सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रिकच असतील – आदित्य ठाकरे

साद मराठी न्यूज नेटवर्क :

पेट्रोल डिझेलच्या गाड्यांमुळे होणारं प्रदुषण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. नववर्षाच्या सुरुवातीला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रिकच असतील, असं आदित्य ठाकरे यांनी घोषित केलं आहे. राज्य सरकारने हा निर्णय याआधीच घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून होणार होती. पण आता ही अंमलबजावणी 1 जानेवारी 2022पासूनच होणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली

इलेक्ट्रिक वाहनांची क्रांती होईल :
इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव सध्या रोज वाढताहेत आणि ते आधीच आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांना अनेकजण पर्याय शोधत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय सध्या देशभरात लोकप्रिय होत आहे. सतत नवनव्या इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर्स लाँच केल्या जात आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांचा पर्याय चांगला असला, तरी त्या घेण्याची सर्वसामान्यांची हिंमत होत नाही. आता मात्र हे चित्र बदलेल अशी शक्यता आहे. येत्या दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कार्सच्या किमती पेट्रोलवर चालणाऱ्या कार्स एवढ्याच होण्याची शक्यता आहे.

बसेसची टप्प्याटप्प्याने सुरुवात :
पर्यावरण प्रदुषणविरहीत करण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले. आपल्या या निर्णयाला पाठींबा दिल्यानिमित्ताने त्यांनी तीनही ज्येष्ठ मंत्र्यांचे आभार मानले. तसेच सरकार राज्यातील परिवहन विभागातही इलेक्ट्रिक वाहन सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून इलेक्ट्रिक वाहनं हे चांगले पर्याय आहेत. आदित्य ठाकरे याआधी अनेक इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित कार्यक्रमांमध्ये हजर राहिले आहेत. बेस्टमध्ये काही इलेक्ट्रिक बसेसची टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button