मंगळवारी वैराग बंद……..

साद मराठी न्यूज नेटवर्क :
मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे हे आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला बसलेले आहेत . त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवार दिनांक १ मार्च रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने वैराग बंदची हाक देण्यात आली आहे…..सकल मराठा समाजाच्या वतीने वैराग बंदचे निवेदन पोलीस ठाणे वैराग ,तहसीलदार बार्शी ,मुख्य अधिकारी नगरपंचायत वैराग तसेच वरिष्ठांना देण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी वैराग चे ग्रामदैवत संतनाथ महाराज यांना नतमस्तक होऊन सकाळी नऊ वाजता वैराग मधील शिवाजी चौकामध्ये सर्वप्रथम ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून त्यानंतर वैराग बंद पुकारण्यात आला आहे.सकल मराठा समाज हा गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणापासून वंचित आहे . मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून या अगोदर अत्यंत शांततेत सर्वात मोठे मोर्चे ,तसेच विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली .सरकार कोणाचेही असो सरकार फक्त आश्वासनांची खैरात मराठा समाजाला देत आहे .या अगोदर खासदार संभाजीराजे यांनी याबाबत सरकार बरोबर चर्चा करून त्यांना विविध मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली होती . मात्र या मागणीला वर्ष – दोन वर्ष उलटली तरी शासनाने मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात काही पावले उचलली नाहीत .त्यामुळे खासदार संभाजीराजे हे २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला बसले आहेत .त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने वैराग बंदची हाक देण्यात आलेली आहे.तरी शासनाने दखल घ्यावी व लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे…….


