तालुक्याचे भाग्य की दुर्भाग्य ? गेल्या महिन्याभरात तीन जवानांना वीरमरण……

साद मराठी न्यूज नेटवर्क :
कैसे सोऊं सुकून की नींद मै साहब,
सुकून से सुलाने वालों के तो शव आ रहे है !
ज्यांच्या जीवावर आम्ही निर्धास्त राहतो त्यांचेच जर जीव चालले तर ……साधी कल्पनाही करवत नाही,पण हे विचित्र वास्तव बार्शी तालुक्यात घडत असुन गेल्या महिनाभरात तीन जवानांना अपघाती वीरमरण आले आहे. हा आघात सर्वांच्याच जिव्हारी लागत असून काळीज ही तुटत आहे……भारत मातेच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांमध्ये बार्शी तालुक्याचाही खारीचा वाटा आहे.तालुक्यातील अनेक गावातून वीर जवान लष्करामध्ये सेवा बजावत आहे. शौर्य,साहस, त्याग आणि समर्पण यामुळे बार्शीचे वेगळेपण कायम जपले गेले आहे. मात्र तालुक्याला कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक ! गेल्या महिनाभरात तीन जवान बार्शी तालुक्यातच नव्हे तर देशाला गमवावे लागले.गौडगाव (ता. बार्शी) येथील रामेश्वर वैजनाथ काकडे (वय ३०) हे केंद्रीय राखीव पोलीस बलामध्ये गेल्या सुमारे दहा वर्षापासून कार्यरत होते. छत्तीसगड येथे कर्तव्यावर कार्यरत होते. त्यांना अल्पशा आजाराने बुधवार दिनांक १६ मार्च रोजी उपचार सुरू असताना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर मूळ गाव गौडगावमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. २०१२ मध्ये रामेश्वर काकडे हे केंद्रीय राखीव पोलिस बलामध्ये भरती झाले होते. सीआरपीएफ मध्ये भरती झाल्यापासून त्यांनी जम्मू-काश्मीर, छत्तीसगड उत्तराखंड आदी ठिकाणी आपली सेवा बजावली होती.ते कर्तव्यावर असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते मात्र दिनांक १६ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक तीन महिन्याचा मुलगा, आई वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.त्यांच्या जाण्याने १६ मार्च रोजी बार्शी हळहळला.

त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी बार्शी तालुक्यातील कासारवाडीचे जवान विठ्ठल खांडेकर यांना देखील वयाच्या ४० व्या वर्षी वीरमरण आले. यांच्यावर दोन एप्रिल रोजी शासकीय इतमामात कासारवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये ते २००४ साली दाखल झाले होते. विठ्ठल खांडेकर जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत असताना चक्कर येऊन पडले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई-वडील भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने बार्शी तालुक्याला पंधरा दिवसात दुसरा मोठा फटका बसला.

ह्या तून कसाबसा सावरत असतानाच पुन्हा पंधरा दिवसात तिसरा धक्का बसला.उत्तराखंड येथे लष्कराच्या ताफ्यातील वाहन दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये रातंजन (ता.बार्शी) येथील जवान गोरख हरिदास चव्हाण यांना वीर मरण आले.गोरख हरीदास चव्हाण हे बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन मध्ये चालक या पदावर कार्यरत होते. गेल्या बारा वर्षांपासून ते देशसेवा करीत होते. दरम्यान उत्तराखंडमध्ये लष्करातील दहा चाकी ट्रक घेऊन ते निघाले होते.ट्रक मध्ये जेसीबी वाहनाचे टोकरे भरले होते. सोमवारी रात्री साडे दहा ते अकरा च्या दरम्यान स्थानिक खाजगी सहकाऱ्यांसमवेत प्रवास करत असताना लष्कराच्या ताफ्यातील ही गाडी दरीत कोसळली.त्यांच्या पश्चात आई – वडील ,पत्नी, आठ वर्षाचा मुलगा, पाच वर्षाची मुलगी, भाऊ ,भावजय असा परिवार आहे. ह्या तिघा जवानांच्या अचानक जाण्याने बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे…..

