देश-विदेश

जिल्ह्यात पांढरे खोकड, भारतातील पहिलीच नोंद….

साद मराठी न्यूज नेटवर्क :

सोलापूर जिल्हा म्हटले की माळढोक पक्षाची चटकन आठवण होते मात्र आता सोलापूर जिल्ह्यात पांढऱ्या रंगाचा खोकड आढळल्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या जैवविविधतेमध्ये वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात पांढऱ्या रंगाचा खोकड आढळणे ही वन्यजीव अभ्यासकांच्या मते ही भारतातील पहिलीच नोंद ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या श्रेणीमध्ये आणखी एकदा सोलापूर जिल्ह्याची ओळख देशभर होत आहे…..

पांढरे खोकड

सोलापूर जिल्ह्यात विविध वन्यप्राणी आढळतात. यामध्ये लांडगा, कोल्हा तसेच खोकड अश्या प्राण्यांचा वावर आहे.अक्कलकोट तालुक्यातील माळरानावर अतिशय दुर्मिळ लुसिस्टिक खोकड पहिल्यांदाच आढळला आहे, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक शिवानंद हिरेमठ यांनी दिली.
खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी, ह्यास Indian Fox इंडियन फॉक्स या नावाने सुद्धा ओळखला जातो. खोकड हा राखाडी तांबूस रंगाचा प्राणी आहे, परंतु यावर्षी निरीक्षण करत असताना पांढऱ्या रंगाचा खोकड (Fox) दिसून आला. ल्युसिस्टिक असलेला हा खोकड संपूर्णतः पांढरा असून शेपटीच्या टोकास काळा रंग आहे असे दिसून आले. यापूर्वी ल्युसिस्टिक रानमांजर व कोल्ह्याची नोंद झाली होती, पण पांढऱ्या खोकडची ही भारतातील पहिलीच नोंद आहे.

खोकडाच्या पांढऱ्या रंगाच्या दिसण्याचे कारण म्हणजे अनुवांशिक उत्परीवर्तन/दोष (Genetic Mutation) होय. यामध्ये अनेक रंगांच्या रंगद्रव्यांच्या आंशिक किंवा संपूर्ण अभाव असतो. ल्युसिस्टिक खोकड हे पूर्णपणे पांढरे असून पाय, चेहऱ्यावर किंवा पाठीवर गडद खुणा दिसून येतात. खोकड हा प्रामुख्याने माळरानात, शेतात व खुरट्या झुडुपांच्या प्रदेशात आढळतो. आकाराने खोकड हा कोल्ह्यापेक्षा लहान असून लांबी 50 ते 60 सेमी इतकी असते, शरीराचा रंग राखाडी तांबूस असतो. दिसायला सडपातळ व लांब झुपकेदार शेपटीमुळे खोकड सहज ओळखता येतो.

खोकड हे जमिनीत, बांधावर किंवा लहानशा टेकडावर बिळ करून राहतात. सरपटणारे प्राणी, लहान सस्तन प्राणी, कीटक, बोर व पक्षी हे त्यांचे मुख्य खाद्य होय तसेच उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवत असल्यामुळे खोकड हा शेतकऱ्यांना हितकारक आहे.

  • शिवानंद ब. हिरेमठ
    सदस्य, वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन, सोलापूर

खोकड प्राण्याविषयी अधिक माहीती :

खोकड हा सस्तन प्राणी मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी येतात. खोकड हा प्राणी कोकरी, लोमडी, छोटा कोल्हा व इंडियन फॉक्स अशाही नावांनी ओळखला जातो. भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत तो सर्वत्र आढळतो. प्रामुख्याने माळरानावर, खुरट्या झुडपांच्या वनात, शेतात, कालव्यांच्या आसपास त्यांचे अस्तित्व असते. भारतात सर्वत्र आढळणार्‍या खोकडाचे शास्त्रीय नाव व्हल्पिस बेंगॉलेन्सिस आहे.

खोकड हा कोल्ह्यापेक्षा आकाराने लहान असतो. त्याच्या शरीराची लांबी डोक्यासकट ४५ ते ६० सेंमी. असते. शेपूट २५ ते ३५ सेंमी. लांब असते. वजन १.५ ते ७ किग्रॅ. असते. खोकड आकाराने लहान व सडपातळ असून पाय वारीक आणि लांबट असतात. शरीराचा रंग करडा किंवा राखाडी असतो. डोके, मान आणि कानामागची बाजू पुसट काळसर तर शेपटीचे टोक काळे असते. पायांचा रंग मातकट लालसर असतो. हिवाळ्यात उत्तर भारतातील खोकडांना दाट केस येतात. त्यामुळे त्यांचे थंडीपासून संरक्षण होते.

खोकड

खोकड जमिनीमध्ये ६०-९० सेंमी. खोलीवर बिळे खोदतात. बिळाला जमिनीच्या दिशेनी ३-४ वाटा असतात. संकटकाळी या वाटांचा त्याला उपयोग होतो. बिळ लांबलचक असून त्यात बरीच जागा असते. दिवसा उन्हाच्या वेळी ते या जागी आराम करतात आणि संध्याकाळी भक्ष्याच्या शोधार्थ बाहेर पडतात. अंधार दाटून आल्यानंतर कोल्ह्याप्रमाणे तेही एकत्र जमून सारखेच ओरडतात. त्यांचे प्रमुख खाद्य उंदीर, घुशी, सरपटणारे प्राणी, खेकडे, कीटक इ. असते. कलिंगडे, बोरे, हरभर्‍याचे घाटेदेखील ते खातात. हा प्राणी मनुष्य वस्तीच्या आसपास राहणारा असला तरी कोंबड्या वगैरे पळवीत नाही. उलट तो उंदीर, घुशी, शेतातील खेकडे खात असतो; त्यामुळे अशा प्राण्यांच्या उपद्रवापासून शेतीचे रक्षण होऊन शेतकर्‍यांना मदतच होते. पावसाळ्यात पांढर्‍या मुंग्या आणि वाळवीदेखील खातो.

शत्रूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तो पळताना आपल्या पायांचा चपळाईने वापर करतो. चटकन वळताना तोल सांभाळण्यासाठी त्याला शेपटीचा उपयोग होतो.

खोकडांची पिल्ले हिवाळ्यात जन्माला येतात. एका वेळेस जन्माला येणार्‍या पिल्लांची संख्या चार असते. मादीच्या गर्भधारणेचा काळ सु. ५३ दिवसांचा असतो. नर आणि मादी दोघेही पिल्लांची काळजी घेतात. पिल्ले लहान असताना त्यांना बिळातच लपवून ठेवले जाते.

जाहीरात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button