देश-विदेश

काय पेट्रोल फक्त १ रुपये ७० पैसे लिटर……पण कुठे… ?

साद मराठी न्यूज नेटवर्क :

एकीकडे भारतामध्ये इंधनाच्या दरांनी उच्चांक गाठलेला असतानाच दुसरीकडे जगात एक असा देश आहे जिथे १.७ रुपये प्रती लिटर दराने पेट्रोल विकलं जातंय. काय वाचून बसला की नाही धक्का, पण हे खरं आहे.

जगभरामध्ये सध्या पेट्रोलचे सरासरी दर १.३३ अमेरिकन डॉलर प्रती लिटर इतके म्हणजेच १०२ रुपये इतके आहेत. भारतामध्ये मागील काही आठवड्यांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. पाच राज्यांमधील निवडूकांचा निकाल लागल्यानंतर मार्च आणि एप्रिलमध्ये वेळोवेळी इंधनाचे दर भारतामध्ये वाढलेत. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये इंधनाचे दर राज्य सरकारांकडून आकारण्यात येणाऱ्या टक्केवारीमुळे वेगवेगळे आहेत. मात्र पेट्रोलचे भारतातील सरासरी दर हे ११३ रुपये प्रती लिटर इतके आहेत.
या देशांमध्ये स्वस्त मिळतं इंधन
१.७ रुपये प्रती लिटर दराने पेट्रोल विकणारा देश कोणता हे जाणून घेण्याआधी सर्वात स्वस्त इंधन मिळणाऱ्या देशांबद्दल थोडं जाणून घेऊयात. जगामध्ये तेलसाठे असणारे काही देश आहेत जिथे इंधन म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल जवळजवळ मोफत किंवा कवडीमोल दरामध्ये मिळतं. उदाहरणार्थ लिबियामध्ये पेट्रोल २.४० रुपये प्रती लिटर दराने विकलं जातं तर इराणमध्ये हाच दर चार रुपये प्रती लिटर इतका आहे. ही माहिती एपीआयच्या माध्यमातून समोर आलेली आहे जे जगातील १३० देशांमधील इंधनाचे दर आणि १५० देशांमधील विजेच्या दरांवर लक्ष ठेऊन असतात.

अमेरिका अपवाद…

सामान्यपणे श्रीमंत देशांमध्ये इंधन आणि वीजेचे दर हे अधिक असतात. तर इंधनाची आयात करणाऱ्या देशांमध्येही अशीच परिस्थिती असते. दुसरीकडे इंधनाची निर्मिती करणाऱ्या देशांमध्ये दर फारच कमी असल्याचं दिसून येतं. मात्र अमेरिकेसारखे देश याला अपवाद आहेत. या देशाची अर्थव्यवस्था सक्षम असूनही येथील इंधनाचे दर नियंत्रणात आहेत. येथील इंधनाचे दर हे साधारणपणे लिटरमागे ९२.५८ रुपये इतके आहेत.

दर वेगवगेळे का?
जगभरामधील इंधनाच्या दरांमध्ये तफावत जाणवण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यावर आकारले जाणारे कर. जागतिक स्तरावर सर्व देशांना एकाच दराने तेल आयात करण्यासाठी उपलब्ध असते. मात्र प्रत्येक देश वेगवेगळ्या प्रमाणात आयात कर आकारतो. त्यामुळेच ग्राहकांना पेट्रोल हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकत घेतल्या जाणाऱ्या इंधनाच्या दरापेक्षा प्रती लिटरमागे अधिक दर देऊन विकत घ्यावं लागतं.

भारतीय उपखंडामधील पेट्रोलचे दर किती?

भारताच्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर ६१.७५ रुपये प्रती लिटर इतके आहेत. नेपाळमध्ये १००.१२ रुपये प्रती लिटर, श्रीलंकेमध्ये ८०.५३ रुपये प्रती लिटर तर बांगलादेशमध्ये ७८.५५ रुपये प्रती लिटर दर पेट्रोलसाठी आकारला जातो. मार्च आणि एप्रिलमध्ये दोन आठवड्यांत इंधनाचे दर प्रती लिटरमागे १० रुपयांनी वाढलेत. भारतीय उपखंडामध्ये सर्वाधिक महाग पेट्रोल भारतातच मिळतं.

सर्वात महागडं पेट्रोल कुठे?

जगातील सर्वात महाग पेट्रोल हाँगकाँगमध्ये मिळते. येथे एक लिटर पेट्रोलसाठी तब्बल १७५ हून अधिक रुपये मोजावे लागतात. सर्वात महागडं पेट्रोल मिळणाऱ्या देशांच्या यादीमध्ये सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक दुसऱ्या स्थानी आहे. येथे पेट्रोल १५० रुपये प्रती लिटरहून अधिक महाग मिळते. नेदरलॅण्डमध्येही पेट्रोल महाग आहे. येथेही साधारण १५० रुपयांच्या आसपास पेट्रोलचे दर आहेत. महागडे पेट्रोल मिळणाऱ्या देशांमध्ये नॉर्वे आणि ग्रीसचाही समावेश होतो. भारतही महागडं पेट्रोल मिळणाऱ्या देशांच्या यादीत इतर शेजारच्या देशांच्या तुलनेत वरच्या स्थानी आहे.

सर्वात स्वस्त पेट्रोल मिळणारा देश कोणता?

मात्र एकीकडे भारतात विक्रमी दराने पेट्रोल विक्री होत असतानाच दुसरीकडे व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतं. येथे एक लिटर पेट्रोलसाठी १.७ रुपये मोजावे लागतात. दक्षिण अमेरिका खंडातील या देशात मुबलक तेलसाठे आहेत. या ठिकाणी फार मोठ्याप्रमाणात तेलाचे साठे असल्याने हा देश मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची निर्यात करतो. म्हणूनच या ठिकाणी फार स्वस्त इंधन मिळतं. याशिवाय कुवैत, अल्जेरिया, अंगोला या देशांचाही सर्वात स्वस्त इंधन मिळणाऱ्या देशांच्या यादीत समावेश होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button