कृषि

मान्सून अंदमानात! केरळ, तामीळनाडूमध्ये अतिवृष्टीचा इशारा, महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांना येलो अलर्ट….

साद मराठी न्यूज नेटवर्क :
अंदमानसह निकोबार आणि बंगालच्या उपसागरात येत्या २४ तासांत कोणत्याही क्षणी मान्सून धडकणार आहे. त्याचबरोबर विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह केरळ, तामीळनाडू आणि लक्षद्वीप बेटांवर अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे या राज्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर राज्यातील कोल्हापूर ,सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसह परभणी, हिंगोली, नांदेड ,लातूर उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांना १६ ते १९ मे पर्यंत चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या चार जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे……..
देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा मान्सून दरवर्षीपेक्षा या वर्षी आठवडाभर आधीच येणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार अंदमानसह निकोबार बेटांवर येत्या २४ तासांत मान्सून धडकणार आहे. पुढील पाच दिवसांत नैऋत्य मोसमी वारे अधिक बळकट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटे आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात विजांचा कडकडाट व वादळी वाऱयासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील २४तासांत या ठिकाणी ६४.४ मिमी ते ११५.४ मिमी पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान विभागाने केरळ, तामीळनाडू आणि लक्षद्वीप बेटांनादेखील पुढील २४ तासांसाठी सतर्कतेचा तीव्र इशारा दिला आहे. या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. येथे ६४.४ मिमी ते २०४.४ मिमी पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
.

पश्चिमी वाऱ्याचाही वेग वाढला,
सध्या अरबी समुद्रातून हिंदुस्थानातील दक्षिणेच्या दिशेने जोरदार पश्चिमी वारे वाहत आहेत. त्यामुळे १६ मेपर्यंत केरळसह कर्नाटक किनारपट्टी, तामीळनाडू, माहे, लक्षद्वीप परिसरात अचानक मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दिल्लीत उष्णतेने विक्रम मोडले, तापमान ४९ अंशांवर
उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असून नवी दिल्लीने आज उष्णतेने आतापर्यंचे सर्व विक्रम मोडले. दिल्लीचे तापमान आज ४९ अंश सेल्सिअसवर पोहोचले. गरम आणि कोरडय़ा हवेमुळे दिल्लीत धुळीची वादळेही येत आहेत. पुढील चोवीस तासांत मोसमी पाऊस अंदमानात दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, केरळ किनारपट्टीवर पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मोसमी पावसाची प्रगती वेगाने होत असून मोसमी पाऊस चोवीस तासांत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या दक्षिण भारतामध्ये मुसळधार पाऊस पडत असून राज्यातील काही जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मान्सून अंदमानच्या दिशेने निघाल्याने दक्षिण भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळात अतिवृष्टी सुरू असून आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम असून तेथील कमाल तापमानाचा पारा ४५ ते ४९ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भात तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअस असल्याची माहिती वेधशाळेकडून देण्यात आली.
विषुववृत्तीय भागाकडून बंगालचा उपसागर आणि अंदमानाच्या समुद्राकडे जोरदार उष्ण प्रवाह वाहत आहेत. त्यामुळेच नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सरासरीच्या वेळेआधी तीन ते चार दिवस झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र आणि निकोबार नैर्ऋत्य मोसमी वारे २० ते २२ मेच्या आसपास दाखल होत असतात. मात्र, अनुकूल स्थितीमुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुकर झाला आहे. अशीच स्थिती पुढील काही दिवस राहिली, तर केरळच्या किनारपट्टीवर देखील वेळेच्या आधी नैर्ऋत्य मोसमी वारे दाखल होण्याची चिन्हे आहेत.
या जिल्ह्यांना इशारा
राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसह परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांना १६ ते १९ मे पर्यंत चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा (येलो ॲलर्ट ) हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या चार जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

जाहीरात

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button